पुणे – मोबाईल सीमकार्ड अपग्रेड करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने तरुणाकडून नेट बॅंकिंगची माहिती घेत तब्बल 18 लाख 25 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. त्यामध्ये 1 लाख 80 हजार बॅंकेतील रकमेचा समावेश आहे. उर्वरित 16 लाख 45 हजार रुपये तातडीने पर्सनल लोन मंजूर करुन घेत फसवणूक केली आहे. ही घटना 6 ते 16 मेदरम्यान घडली
याप्रकरणी सचिन कुलकर्णी (वय 45, रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन एका आयटी कंपनीत कामाला असून कोथरुडमध्ये राहायला आहेत. त्यांचे भांडाकर रस्त्यावरील एका खासगी बॅंकेत खाते आहे. 6 मे ला सचिन कामावर असताना त्याला सायबर चोरट्याने फोन केला.
मोबाईल कंपनीत बोलत असल्याचे सांगत तुमचे सीमकार्ड अपग्रेड करुन देतो असे त्याने सांगितले. त्यानुसार सीमकार्डच्या प्रक्रियेसाठी सायबर चोरट्याने सचिन यांच्याकडून नेट बॅंकिगची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने सचिनच्या बॅंक खात्यातून ऑनलाईनरित्या 1 लाख 80 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग करुन घेतले. कामात असल्यामुळे सचिनला बॅंकेतून पैसे कमी झाल्याची माहिती मिळाली नाही.
त्यानंतर सायबर चोरट्याने सचिनच्या नेट बॅंविैंग अकाउंटवरुन संबंधित बॅंकेकडे पर्सनल लोनसाठी अर्ज केला. बॅंकेने खातेधारक सचिन असल्याचे समजून तातडीने 16 लाख 45 हजार रुपये मंजूर केले. त्यानंतर सायबर चोरट्याने तातडीने मंजूर झालेले लोन स्वतःच्या बॅंकखात्यात वर्ग करुन तब्बल 18 लाख 25 हजारांची फसवणूक केली. काही दिवसांनी सचिनने बॅंकखात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेज वाचल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोथरुड पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली.