खारतोम (सुदान) : सुदानमधील एका फरशांच्या कारखान्यात झालेल्या एलपीजी टॅंकरच्या स्फोटात 18 भारतीयांसह 23 जणांचा मृत्यू झाला. ही घटना खारतोम येथील बाहरी भागात घडली.
या अपघातानंतर तेथील 18 भारतीय बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 18 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. बेपत्ता झालेले अनेक जण मरण पावले असू शकतात. हे मृतदेह जळून गेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही, असे भारतीय दुतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतीय दुतावासाने मृतांची, जखमी झालेल्यांची आणि बेपत्ता झालेल्यांची सविस्तर यादी प्रसिध्द केली आहे. यानुसार सात जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातात 23 जण मरण पावले. तर 130 जण जखमी झाले. घटनास्थळावर सुरक्षा उपाय योजनांचा अभाव असल्याचे आढळून आले आहे. तेथे ज्वलनशील पदार्थ पुरेशा खबरदारीविना ठेवण्यात आले असल्याचे आढळून आले आहे. याबाबत तपास सुरू करण्यात आल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले.