अर्थमंत्रालयाकडून स्पष्टीकरण
नवी दिल्ली – करोनाचा मुकाबला करण्यासाठी हॅंड सॅनिटायझरचा उपयोग होतो. यावर 18 टक्के जीएसटी नसावा असे मत व्यक्त केले जात आहे. मात्र, 18 टक्के जीएसटी सुयोग्य आहे, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
सॅनिटायझर तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो, त्यावर 18 टक्के जीएसटी असतो. कच्च्या मालापेक्षा तयार मालावर जीएसटी कमी असल्यास करविषयक गुंतागुंत निर्माण होते. त्याचबरोबर जर सॅनिटायझरवरील जीएसटी कमी केला तर आयात सॅनिटायझर स्वस्तात पडतील. त्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर परिणाम होईल. या कारणासाठी सध्याच्या परिस्थितीत 18 टक्के जीएसटी योग्य असल्याचे मत अर्थमंत्रालयाने व्यक्त केले.
यासंदर्भातील प्रकरण गोवा येथील ऍथॉरिटी फॉर ऍडव्हान्स रुलिंगकडे गेले होते. याप्रकरणी 18 टक्के जीएसटी लागेल असा निर्णय देण्यात आला.
विशेष म्हणजे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये केला आहे. मात्र, जीएसटी कायद्यानुसार जी यादी तयार केली जाते त्या यादीमध्ये सॅनिटायझरचा उल्लेख नाही. या परिस्थितीत अर्थमंत्रालयाकडून या विषयावर स्पष्टीकरणाची अपेक्षा विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आली होती.