रेडा – केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून बंदी असलेल्या मांगुर जातीच्या विषारी माशांचे बेकायदेशीररीत्या संवर्धन केल्याप्रकरणी आज सकाळी 11 वाजता कारवाई करीत एकूण 18 जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी फरार झाले आहेत. याबाबत महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) अविनाश पांडुरंग नाखवा यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे करीत आहेत.
यात आरोपी संदीप जाधव, यासिन शेख, दिलावर शेख, सुखदेव कृष्णा घाडगे, सलीम बागवान, रणजित सपकाळ, आण्णा पोपट कोळेकर, यशवंत जगताप, अकबर शेख, संजय पोपट पाडुळे, विजय पाडुळे, अमोल कदम, पोपट कदम, विठ्ठल पाडुळे, महेश जालींदर कोळेकर, युनुस महंमद पठाण, दत्तात्रय सोपान सपकाळ, सुरज राजेंद्र पाडुळे (सर्व आरोपी रा. कालठन नं.1, ता. इंदापूर) अशी आरोपींची
नावे आहेत. बंदी घातलेल्या मांगुर जातीच्या विषारी व सर्वभक्षी माशांचे इंदापूर तालुक्यातील कालठण नं.1 या ठिकाणी अनेक वर्षांपासून शेततळ्यांमध्ये बेकायदेशीररित्या संवर्धन होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या माशांना कत्तलखान्यातील व चिकन सेंटर वरील वेस्टेज मटेरियल खाद्यान्न म्हणून दिले जाते, त्यामुळे ज्या भागात मांगुरची तळी आहेत त्या भागामध्ये या वेस्टेज मटेरियलची प्रचंड दुर्गंधी सुटल्याने अनेक नागरिकांनी “मत्स्य’कडे तक्रारी केल्या होत्या, त्याची दखल घेत ही कारवाई केली आहे. याबाबत शेती मालकांना मत्स्य विभागाकडून हे बेकायदेशीर मत्स्य प्रकल्प बंद करण्याबाबत कळविले असताना अद्यापही प्रकल्प बंद केले नसल्याने शासनाकडून 18 आरोपींवर कारवाई केली आहे.
तालुक्यात वार्षिक दहा कोटींची उलाढाल
इंदापूर तालुक्यात उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तळी करून या मांगुर माशांचे संवर्धन केले आहे हे मासे तालुक्याच्या बाहेर विक्री करण्यात येतात तर मुंबईपासून इंदापूर पर्यंत अनेक हॉटेलमध्ये या मांगुर माशांची विक्री करून वार्षिक उलाढाल जवळपास दहा कोटी रुपयांची होते, अशी माहिती सूत्रांकडून समजली.