नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणाऱ्या एका माजी कर्मचारी महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. सरन्यायाधीशांवर लावण्यात आलेल्या या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची अंतर्गत त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या त्रिसदस्यीय समितीकडून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमधून क्लीन चिट देण्यात आली आहे. आरोप लावणाऱ्या महिलेने सबळ पुरावे सादर न केल्याने हा निर्णय देण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या पत्रकार परिषदेद्वारे सांगण्यात आलं होत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर दोन जवळ प्रदर्शन करणाऱ्या सतरा महिलांना आज पोलिसांतर्फे ताब्यात घेण्यात आलं आहे. या बाबत नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, “सदर महिलांना राम-लीला मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती मात्र त्यांनी कॅनॉट प्लेस येथील मेट्रो स्थानकाच्या गेट नंबर दोन जवळ प्रदर्शन केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आलं होत मात्र आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.”