सोनवणे हॉस्पिटलचे 17 कर्मचारी “क्वारंटाइन’

डॉक्‍टर, आया, नर्सचा समावेश : आयसीयू, मॅटर्निटी होम बंद

पुणे – ताप येत असल्याने उपचारासाठी महापालिकेच्या भवानीपेठ येथील सोनवणे प्रसृतीगृहात आलेल्या गर्भवती महिलेला करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसह सुमारे 17 जणांना “क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्वांची करोनाची तपासणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुन्हा सात दिवसानंतर या सर्वांची करोनाची चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे तूर्तास या सर्वांना “क्वारंटाइन’ केल्याचे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केले.

वारजे येथील ही पाच महिन्यांची गर्भवती सोनवणे रुग्णालयात दाखल झालेली होती. तिला ताप असल्याने रक्त तपासणीनंतर डॉक्‍टरांनी टायफॉइड झाल्याने उपचार सुरू केले होते. मात्र, महिलेची लक्षणे करोनासदृश वाटल्याने या महिलेच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या 3 आरएमओ, 9 नर्स,1 आया, 2 नर्सिंग ऑर्डली, तसेच 2 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या सर्वांच्या घशातील द्रवाचे नमुने तापसणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना संसर्ग होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन सात दिवसानंतर या सर्वांची पुन्हा करोनाची तपासणी करण्यात येणार आहे.

एनआयसीयू प्रसूतीगृह बंद
या दवाखान्यात महापालिकेचे लहान मुलांचे आयसीयू सुरू होते. तसेच महापालिकेचे शहरातील प्रमुख प्रसूतीगृह आहे. मात्र, या ठिकाणी आता करोनाचा रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हंकारे यांनी स्पष्ट केले. मात्र, या ठिकाणी मोठया प्रमाणात ओपीडीसाठी रुग्ण तपासणीस येत असल्याने आवश्‍यक ते खबरदारीचे उपाय घेऊन ओपीडी मात्र सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.