पुणे – शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना शनिवारी दिलासादायक माहिती समोर आली. दिवसभरात सापडलेल्या नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 1,696 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर नव्याने 1,637 बाधित सापडले..
दरम्यान, शहरातील करोनामुळे मृत्यु होणाऱ्याचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारीही शहरात 60 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहर-36, तर अन्य जिल्ह्यांतील 24 जणांचा समावेश आहे.
शहरात मागील दहा दिवसांपासून करोना संशयितांची नमुने तपासणी संख्या दीड ते दोन हजारांनी कमी झाली आहे. त्यामुळे बाधित संख्याही कमी झाली आहे. शनिवारी दिवसभरात 5,503 संशयितांची तपासणी करण्यात आली. तर आतापर्यंत तब्बल 6 लाख 6 हजार 594 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.
त्यामध्ये 1 लाख 40 हजार 588 जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यातील 1 लाख 19 हजार 577 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात सध्या 17 हजार 679 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 932 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 514 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 418 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.