पुणे – रेल्वे स्थानक तसेच रेल्वे प्रवासात हरवलेल्या मुलांना शोधण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे. या सुरक्षा दलाने राज्यातील विविध विभागात हरवलेल्या 163 मुलांचा शोध घेवून त्या मुलांना कुटुंबीयांकडे सोपविले आहे. हरवलेल्या मुलांच्या शोध घेण्याच्या मोहिमेला “ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ असे नाव देण्यात आले आहे.
रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी मे 2023 पर्यंत हरवलेल्या 163 मुलांना शोध घेतला आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे. शोधण्यात आलेल्या 163 मुलांमध्ये 133 मुले आणि 30 मुलींचा समावेश आहे. त्यांना चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यात आले आहे.
काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवान कडून शोधून काढतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि पालकांसह एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या सेवेबाबत पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.