पुणे –हवेली, वेल्हा, दौंड भागातबाधित रुग्ण सापडत आहेत. हा प्रसार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेल्या आहेत. या सर्व माहिती संकलन, सर्व विभागांतील समन्वय व क्षेत्रीय स्तरावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षातून मागील महिनाभरात 16 हजार 622 फोन केले असून संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
गावपातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शेती अधिकारी, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी ते प्रांत यांच्याशी कक्षातून दररोज संपर्क ठेवला जातो. करोना संबंधित रुग्ण, सर्वसाधारण नागरिकांच्या अडचणी, बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची माहिती त्याचबरोबर पाणी टंचाईची सद्यस्थिती, मनरेगा कामांची स्थिती, शेतीविषयक कामे, पोलीस संरक्षण, चेक पोस्ट, खरीप हंगाम, मान्सूनपूर्व तयारी याबाबत दररोज सुमारे साडेचारशे ते पाचशे फोन केले जात आहेत. याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे अडचणी सोडवल्या जात आहेत.
तक्रारींमध्ये प्रामुख्याने भोजन, अन्नधान्य वितरण, वैद्यकीय सुविधा, परराज्यात, जिल्ह्यात जाणारे नागरिक अथवा मजूर याबाबतची अडचणींचे फोन हेल्पलाईनवर येत आहेत. आतापर्यंत 384 तक्रारींचे निवारण केले आहे. पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांसाठी 12 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्यात येत आहे.