पुणे (प्रतिनिधी) – शहरात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे विविध भागात तब्बल 160 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. वादळामुळे झाडे पडल्याने 15 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती अग्निशमक दलाच्या जवानांनी दिली.
दोन दिवसांपासून पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्यामुळे शहरात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी 60 तर, गुरूवारी रात्रीपर्यंत 160 झाड पडीच्या घटना घडल्या.
त्याशिवाय पावसामुळे विविध भागात पाणी साठल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागल्याचे दिसून आले. वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेली झाडे काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानाकडून करण्यात आले. कोथरूड, हडपसर, विश्रांतवाडी, विमाननगर, पाषाण, मुंढवा, डेक्कन, मध्यवस्तीचा परिसर, कोरेगाव पार्क, येरवडा, गंजपेठ, मालधक्का चौक, महानगरपालिका भागात झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, पाउस आणि वादळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन अग्निशमक दलाने केले आहे.