भारतीय शीख महिलेचाही समावेश
कुआलालंपूर (मलेशिया)- मलेशिया पोलिसांनी आज 16 संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यामध्ये भारतीय वंशाच्या एका शीख महिलेचाही समावेश आहे. हे सर्वजण एका स्थानिक राजकीय पक्षाच्या नेत्यावर हल्ला करण्याचा कट करत होते. हे सर्व संशयित इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. 10 ऑगस्ट आणि 25 सप्टेंबर दरम्यान कुआलालंपूर, सबाह, पहांग, जोहोर, पेनांग आणि सेलांगोर शहरांमध्ये करण्यात आलेल्या विशेष कारवाईदरम्यान या सर्व संशयितांना अटक करण्यात आली, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
अटक करण्यात आलेल्या 16 संशयितांमध्ये 12 जण इंडोनेशियाचे, तिघेजण मलेशियाचे आणि एक भारतीय आहे, असे मलेशिया पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाचे सहायक संचालक आयोब खान म्यादिनयांनी सांगितले. अटक करण्यात आलेली भारतीय शीख महिला स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते आणि “सिख्स फॉर जस्टीस’ या फुटिरतावादी संघटनेची सदस्या आहे.
भारताने देशविरोधी कारवाया केल्याबद्दल या खलिस्तान समर्थक गटावर जुलै महिन्यात बंदी घातली होती. अमेरिकेतील “एसएफजे’ने फुटीरवादी अजेंडाचा भाग म्हणून “शीख जनमत 2020′ वर जोर दिला आहे. पंजाबमध्ये स्वतंत्र आणि सार्वभौम देश स्थापन करणे हे या गटाचे मुख्य उद्दीष्ट आहे.
साबाहमध्ये अटकेत असलेल्या दोघा मलेशियन इस्लामिक स्टेटचा प्रसार केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फिलीपिन्समधील चर्चवर आत्मघातकी बॉम्बहल्ला करणाऱ्या इंडोनेशियन जोडपे आणि त्यांच्या तीन मुलांना सहकार्यही केले होते. या हल्ल्यासाठी दक्षिण फिलिपाईन्समध्ये मऊते या दहशतवादी गटाला पैसे पाठवण्याची सोयही या दोघांनी केली होती.
तसेच दहशतवादी कारवायांमध्ये इंडोनेशियन आणि मलेशियन लोकांसह नवीन सदस्यांची भरती करण्यासाठी देखील सक्रिय होते. जास्तीत जास्त सदस्यांची भरती केल्यावर मलेशिया आणि इंडोनेशियात हल्ले करण्याची योजना त्यांनी आखली होती, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.