नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात 16 पोलिस शहिद

गडचिरोली – नक्षलवाद्यांनी घडवलेल्या “आयईडी’च्या स्फोटामध्ये 16 सुरक्षा रक्षक शहिद झाले. गडचिरोली जिल्ह्यातील कारखेडा येथील जलद प्रतिसाद दलाचे वाहन नक्षलवाद्यांच्या स्फोटात उडवून देण्यात आले. या शहीद जवानांमध्ये गडचिरोलीमधील सहा, भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तसेच हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे. ही घटना जाबुरखेडा आणि लेंधारी दरम्यानच्या मार्गावर बुधवारी झाली, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

तर एका अन्य घटनेमध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांचे आणखी एक वाहन “आयईडी’ने उडवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 10 सुरक्षा रक्षक जखमी झाले. तर कुरखेडामध्ये रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या 27 वाहनांनाही नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. कालच्या या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक गावांमध्ये लावण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गडचिरोलीनंतर आता बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. गया जिल्ह्यातल्या बाराचट्टी भागात रस्ते निर्मितीच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि ट्रॅक्‍टर नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. बाराचट्टीतल्या भोक्ताडीह आणि जयगीर दरम्यान बुधवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.


पंतप्रधानांकडून तीव्र दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घातपाताबाबत तीव्र दुःख व्यक्‍त केले आहे. या हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे हौतात्म्य विसरले जाणार नाही. हा शहिदांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या सहवेदना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्‌यामध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे, तसेच नक्षलवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.