शहरातील बाधित रुग्णांची संख्या 459 वर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी गुरुवारी (दि. 28) केवळ 16 जणांना करोनाची बाधा झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांतील आकड्यांच्या तुलनेत आज बाधितांची संख्या निम्म्याने घटली आहे. बाधितांमध्ये शहरातील 13 तर शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे.
ताज्या आकडेवारीनुसार बाधितांसह शहरातील रुग्णांची संख्या 459 वर पोहोचली आहे. तर गोखलेनगर पुणे येथील रहिवाशी असलेल्या मात्र वायसीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका व्यक्तीचा गुरुवारी मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांच्या आकड्याने गेल्या चार ते पाच दिवसांत मोठा पल्ला गाठला होता. 40 हून अधिक बाधित रोज आढळून येत होते. मात्र आज 16 जण बाधित झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. बुधवारी पाठविलेल्या स्वॅबचे चाचणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. आजच्या अहवालानुसार शहरातील 7 पुरुष आणि 6 स्त्रियांना करोनाची बाधा झाली आहे. तर शहराबाहेरील बाधितांमध्ये तीन पुरुषांचा समावेश आहे.
आजच्या आढळून आलेले बाधित हे आनंदनगर, बौद्धनगर, थेरगाव, बजाज ऍटो कॉलनी, किवळे येथील रहिवाशी आहेत. तर दिवसभरात 6 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. हे सर्वजण आनंदनगर, चिंचवड येथील रहिवाशी आहेत. वायसीएम रुग्णालयात दिवसभरात 113 नवे संशयित दाखल झाले असून, त्यांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे 242 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
एक जणाचा गुरुवारी मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 18 झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 197 वर पोहोचली आहे. वायसीएम रुग्णालयात एकूण 265 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. महापालिकेने आतापर्यंत 5706 जणांची करोना तपासणी केली असून, त्यापैकी 5033 जणांचे अहवाल हे “निगेटिव्ह’ आले आहेत.