नवी दिल्ली – पंधराव्या वित्त आयोगाचा अहवाल आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सादर करण्यात आला. आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी सन 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठीचा आपला अहवाल सादर केला आहे.
फायनान्स कमिशन कोविड टाईम्स असे शिर्षक या अहवालाला देण्यात आले आहे. यावेळी आयोगाचे सदस्य अजय नारायण झा, अनुपसिंग, अशोक लहरी आणि रमेशचंद हेही उपस्थित होते.
या आयोगाला विविध विषयांवरील आपल्या शिफारसी सुचवण्याची सुचना करण्यात आली होती.
त्यात कर विषयक प्रणाली, स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यायचे अनुदान, आपत्ती निवारण निधी, ज्या राज्यांनी चांगली कामगीरी केली आहे त्यांना देण्यात यायचा विशेष प्रोत्साहन निधी अदि बाबत त्यांना शिफारसी करण्यास सांगण्यात आले होते.
हा अहवाल एकूण चार भागात आहे. आयोगाने प्रत्येक राज्याच्या आर्थिक स्थितीचा तपशिलाने अभ्यास केला आहे. राज्यांच्या आर्थिक स्थितीपुढील आव्हानांचीही माहिती या आयोगाने घेतली आहे. सदर अहवाल संसदेत सादर केल्यानंतर तो जनतेसाठी खुला केला जाणार आहे.