पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी (दि. 21) 151 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 104 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरातील 2 लाख 55 हजार 539 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 7 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 4 व शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे.त्यापैकी गेल्या 24 तासात 3 बाधितांचा मृत्यू झाला असून उर्वरित मृत्यू हे मागील असून त्यांची सोमवारी नोंद करण्यात आली. आजपर्यंत शहरातील 4264 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 104 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 49 हजार 992 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3669 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1020 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 269 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1289 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयाचे 50 टक्के रुग्ण घरीच झाले बरे
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात करोनाबाधित आढळलेले मात्र सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणात उपचार घेत असलेले 2074 रुग्ण हे घरीच बरे झाले आहेत. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 49.54 टक्के इतके आहे.जिल्हा रुग्णालयात रविवारपर्यंत (दि. 20) एकूण 5 हजार 276 रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 4 हजार 186 रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधित रुग्णांतील 2081 जणांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू होते. त्यापैकी 2074 रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 49.54 टक्के इतके आहे. जिल्हा रुग्णालयात पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विविध करोना संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णालयामध्ये त्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे. रुग्णालयातील करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या मात्र सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्यासाठी वैद्यकीय सल्ला दिला जातो. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी रुग्णालयाचे डॉक्टर संपर्कात असतात. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहे का, याची चाचपणी केली जाते. गृहविलगीकरणात उपचार घेत असलेल्या रुग्णांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल अथवा प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले जाते.
जिल्हा रुग्णालयातून रविवारपर्यंत 1 हजार 383 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्णालयातून 352 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 355 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 16 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.