नारायणगाव -पिंपळवंडी गावच्या हद्दीत लक्ष्मी खानावाळीच्या पाठीमागे 15 हजार 524 किमतीची बेकायदा बिगरपरवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या एकावर आळेफाटा पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
गणेश भारत लेंडे (रा. पिंपळवंडी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोंडीभाउ डामसे यांनी दिली. पिंपळवडी एस टी स्टॅंडच्या पाठीमागे लक्ष्मी खानावळीचे आडोशाला गणेश लेंडे हा बेकायदा बिगरपरवाना देशी-विदेशी दारूचा साठा जवळ बाळगून आपल्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली.
पोलिसांनी छापा टाकून 15 हजार 524 किमतीची दारू जप्त केली असून गणेश लेंडे हा तेथून फरार झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. ए. डौले, सहायक फौजदार सतीश घाडगे, पोलीस नाईक रफिक तडवी, अशोक फलके, नाईक, आनंदगावकर यांनी केली आहे.