– पहिला गुन्हा दाखल होऊन दोघे गजाआड
– सांस्कृतिक शहरासाठी लज्जास्पद बाब
पुणे: पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातून तब्बल 100 ते 150 चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ ऑनलाइन अपलोड करण्यात आले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने याची माहिती पुणे सायबर पोलिसांना दिल्यावर दोघा भावांविरोधात खडक पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. या नराधमांना अटक करण्यात आली आहे.
राजकरण पुट्टीलाल (24, रा. गुरुवार पेठ) आणी मनोजकुमार झल्लार सरोज (19, रा. रविवार पेठ) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रथम सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारतात कायद्याने चाइल्ड पॉर्नोग्राफीला बंदी आहे. गुगलने काही दिवसांपूर्वीच भारतातून अपलोड करण्यात आलेल्या चाइल्ड पॉर्नोग्राफीची जवळपास 35 हजार व्हिडीओंची माहिती केंद्र सरकारला कळवली होती. त्यानुसार केंद्र सरकारने त्या-त्या राज्यातील पोलीस महासंचालक कार्यालयांना ही माहिती पाठवली. पोलीस संचालक कार्यालयाने संबंधीत शहरातील पोलीस आयुक्तांकडे ही माहिती दिली. दरम्यान, पोलीस महासंचालक कार्यालयातून पुणे सायबर पोलिसांना पुण्यातून अपलोड झालेल्या 100 ते 150 व्हिडिओंची माहिती दिली आहे. हे व्हिडीओ ज्या मोबाइल किंवा लॅपटॉपवरुन डाउनलोड झाले आहेत. त्याचा यूएलआर नंबरवरुन मालकाचा शोध घेतला जात आहे.
खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मोबाइल सिमकार्ड मालक राज पुट्टीलाल याला अटक करण्यात आली. त्याने त्याच्या नात्यातील भाऊबंद मनोजकुमारला तो अल्पवयीन असताना स्वत:च्या नावाने सिमकार्ड घेऊन दिल्याची माहिती दिली. मनोजकुमारने त्याच्या मोबाइलवरुन यूट्युबवर चाइल्ड पॉर्नोग्राफीचा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी अपलोड केला होता. त्यानुसार दोघांना अटक केली. दोघेही मजुरी काम किंवा मिळेल ते काम करतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.