सुधारित मार्गाची आखणी चुकीची असल्याचे आक्षेप
पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने प्रस्तावित केलेल्या सुमारे 36 किलोमीटरच्या “एचसीएमटीआर’ मार्गात महापालिकेने 11 ठिकाणी बदल केला आहे. यावर सुमारे 150 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. भूसंपादनाची जागा कमी करणे तसेच मार्गावर आधीच पालिकेच्याच मान्यतेने रहिवासी बांधकामे झाल्याने या मार्गात बदल करण्यात आला आहे.
या संपूर्ण उन्नत मार्ग 11 ठिकाणी बांधलेली घरे, तसेच काही ठिकाणी संरक्षण विभागाच्या हद्दीतून जात आहे. त्यात लोहगाव, वडगाव शेरी, बोपोडी, वानवडी, बिबवेवाडी, कोथरूड या भागांचा समावेश असून हे बदलण्यात आलेले अंतर सुमारे 700 ते 800 मीटर आहे. त्यामुळे प्रशासनाने या बदलांबाबत स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता नुकतीच घेऊन यावर हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. त्यात प्रामुख्याने सुधारित मार्गाची आखणी चुकीची असून ती रद्द करण्यासह मूळ मार्गाच कायम ठेवण्यात यावा, अशा प्रमुख हरकतींचा समावेश आहे. दरम्यान, पालिकेकडे अजूनही काही व्यक्तिगत स्वरूपाच्या हरकती येत असून लवकरच या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन मार्गाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
जागांची मोजणी झाली, पण नकाशे मिळेनात
या रस्त्यासाठी लागणाऱ्या शासकीय जागांची मोजणी पूर्ण झालेली असली, तरी अजून त्याचे नकाशे महापालिकेस प्राप्त झालेले नसल्याचे समोर आले आहे. ही मोजणी पूर्ण होऊन जवळपास दोन महिने झाले असले, तरी अजून हे नकाशे मिळालेले नाहीत. तर शासकीय कर्मचारी निवडणूक कामात असल्याने हे नकाशे अजून आलेले नसून लवकरच ते प्राप्त होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.