23 प्रवाशांवर रेल्वे कोर्टात खटला
चेन पुलिंगप्रकरणाने रेल्वेला फटका
पुणे विभागात दररोज सरासरी तीन घटना
पुणे – एका रेल्वेची चेन ओढल्यानंतर कमीत-कमी दहा मिनिटांचा वेळ वाया जातो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला प्रतिमिनिट 15 हजार रुपयांचा तोटा होतो. गेल्या काही दिवसांत 34 चेन पुलिंगच्या प्रकरणांमध्ये 23 प्रवाशांवर रेल्वे कोर्टामध्ये खटला चालविला जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी रेल्वेतर्फे बाजू मांडली जात आहे.
पुणे विभागात दररोज सरासरी तीन चेन पुलिंगच्या घटना घडत आहेत. यापुढेही चेन पुलिंग करुन प्रवाशांना वेठीस धरत रेल्वेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी दिला आहे. दरम्यान, प्रवाशांनी विनाकरण चेन ओढू नये आणि इतर प्रवाशांना नाहक वेठीस धरू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
पुणे स्टेशनवर 12 मेटल डिटेक्टरची गरज
पुणे रेल्वे स्थानकावर आणखी 12 मेटल डिटेक्टरची गरज आहे. सध्या केवळ दोनच मेटल डिटेक्टर असून एक बॅग स्कॅनर मशिन आहे. त्यामुळे पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराचा प्रश्न ऐरणीवर आहे. याबाबत शर्मा म्हणाल्या, ताडीवाला रोड बाजूकडील दुसऱ्या प्रवेशद्वारावर वाहनांची तपासणी करणारे व्हेइकल स्कॅनिंग मशिन आहे. ही संख्या तोकडी असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणखी मेटल डिटेक्टर आणण्याची गरज असल्याचे, शर्मा यांनी सांगितले.
“ते’ एन्ट्री पॉइन्ट लवकरच बंद
विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रेणू शर्मा यांनी गुरुवारी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. हडपसर रेल्वे टर्मिनसचा प्रकल्प 20 कोटी रुपयांचा असून हे काम लवकरात-लवकर पूर्ण करणार आहे. तसेच पुणे स्थानकावर सातपैकी पाच अनधिकृत एन्ट्री पॉइन्ट लवकरच बंद करण्यात येणार आहेत. फलटण-बारामती प्रकल्पास स्थानिकांनी जमिनी देण्यास विरोध केल्यामुळे हा प्रकल्प रखडला असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लावणार आहे, असे शर्मा म्हणाल्या.