आपत्तीचा सामना करण्यासाठी 15 पथके

परिसराच्या माहितीसह आवश्‍यक साहित्यही पुरविणार
24 तास क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत
पुणे – पावसाळ्यातील आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर प्रत्येकी 25 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची सुमारे 15 पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी दिली. या पथकाकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्‍यक सुविधा देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात नदीत पाणी सोडल्यानंतर शहरात नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घुसते. या पाण्यामुळे अनेक झोपडपट्ट्यांचा भाग तातडीने स्थलांतरित करण्याची गरज भासते, तसेच अनेक ठिकाणी नाल्यांनाही बॅकवॉटरमुळे पूर येऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरते. अशा स्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी मदतीची आवश्‍यकता भासते.

त्यावेळी अग्निशमन दल मदतीसाठी पोहचत असले, तरी तातडीच्या मदतीसाठी ही पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांकडे पावसाळ्यात धोका निर्माण होणाऱ्या परिसराच्या माहितीसह आसपासची मदतीची ठिकाणे, आवश्‍यक पंप, वाहने, बोटी यांचे साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही पथके 30 सप्टेंबरपर्यंत कार्यरत असतील. ही सर्व पथके क्षेत्रीय कार्यालयावर स्थापन करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात असून हे सर्व 15 कक्ष मुख्य नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे माहितीची देवाणघेवाण करून मदतकार्य सुरू करण्यात कमी वेळ जाणार असल्याचे सोनुने यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.