सातारा -जिल्ह्यातील 15 करोनाबाधित शनिवारी करोनामुक्त झाले. रायगाव, खावली येतील करोना केअर सेंटरमधून 11 तसेच कराडमधून चार रुग्ण करोमनामुक्त झाले. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रायगाव आणि खावली येथील करोना केअर सेंटरमधून 11 जणांचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये मायणी येथील 1, डिस्कळ येथील 1, कोरेगावमधील न्हावी बुद्रुक येथील 1, वारणानगर येथील 3, शेंद्रे येथील 1, खंडाळामधील कवठे जवळे येथील 1, अजनुज येथील 2, वाईमधील आसरे येथील 1 अशा 11 जणांचा समावेश आहे.
कराड तालुक्यातील म्हासोली, नांदगाव आणि शामगाव येथील एकूण चार जण करोनामुक्त युवकांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 81 जण करोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
म्हासोली येथील 32 वर्षीय व 33 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 22 वर्षीय व शामगाव येथील 22 वर्षीय युवक यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलच्या करोना कक्षात उपचार सुरू होते. अहवाल निगेटिव्ह आल्याने शनिवारी दि. 30 रोजी टाळ्यांच्या गजरात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, अशोक भापकर यांच्या हस्ते करोनामुक्त झालेल्या युवकांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. संजय पाटील, डॉ. रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.