प्रशांत जाधव
सातारा – दुर्मिळ वनसंपदा असल्याने त्याची तोड करण्यास अथवा विक्री करण्यास बंदी असलेल्या खैराची बेकायदेशीर तोड करून सुमारे 15 लाखांच्या सरकारी महसुलाला चुना लावल्याची घटना डांबेवाडी (ता. खटाव) येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आली.
मात्र, याबाबत वन विभागाला काहीच माहिती नसल्याचे समोर आल्याने याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कधी काळी विपुल वनसंपत्ती असलेल्या झाडांना नष्ट करण्याचा विडा जंगल माफियांनी वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उचलला आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. खटाव तालुक्यातील डांबेवाडी परिसरात सध्या सुरू असलेल्या अवैध खैर लाकूड तोडीकडे वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच तिथे बेसुमार तोड सुरू असल्याचा आरोप होत आहे. डांबेवाडी येथील महसूल क्षेत्रातील चार शेतकऱ्यांच्या मालकीमध्ये खैर वृक्षाची बेकायदेशीरपणे कत्तल सुरू आहे.
याबाबत त्यांनी वन विभागाकडे तक्रार करूनही काही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणच्या खैराच्या झाडांची कत्तल करणाऱ्या व्यापाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. गेली आठ दिवस सुरू असलेली या गावातील वृक्ष तोड वनविभागाला कशी दिसली नाही, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. तोडलेली लाकडे कधी कातरखटावमार्गे तर कधी दोरगेवाडी, नरवणे (ता. माण) या गावातून व्यापाऱ्याच्या स्वच्छ आणि सुंदर गावाकडे नेली जातात.
मात्र, वृक्षतोडीपासून ते वाहतूकीपर्यंत याचा साधा मागमूस वन विभागाला लागत नसल्याने दाल मे कुछ काला है’, अशी चर्चा खटाव तालुक्यात सुरू आहे. खैराच्या लाकडाच्या व्यापारातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. मात्र, अधिकारी अन् व्यापारी यांच्यातील मामल्यामुळे सरकारचा महसूल बुडत असल्याचे वास्तव आहे.
चार किलोमीटर क्षेत्रावर कटर फिरले
डांबेवाडी (ता.खटाव) ते नरवणे (ता.माण) या दोन्ही गावांच्या मध्यावर असलेल्या डोंगरावर सुमारे चार किलोमीटर क्षेत्रात खैराची बेकायदा तोड झाली आहे. मात्र, वनविभागाला याचा साधा मागमूस नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
…म्हणे रेड हॅंड पकडू
ग्रामस्थांनी हा सगळा प्रकार “प्रभात’कडे कथन केल्यानंतर या प्रतिनिधीने खटावच्या विभागीय वन अधिकारी मनीषा कंठाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी डांबेवाडीत सुरू असलेली खैराची तोड सुरू असल्याचे मान्य करून आम्ही लवकरच संबंधितांना “रेड हॅंड पकडू’, असा दावा केला.