दुसरी लस घेऊनही 15 पोलीस बाधित

2574 पोलिसांनी घेतला पहिला डोस : दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या अवघी 1152

पिंपरी – करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेऊनही 15 पोलीस करोना बाधित झाले आहेत. आत्तापर्यंत 84 टक्‍के पोलिसांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे.

करोनाचा प्रसार होऊ लागल्यापासून पोलीस कर्मचारी फ्रंट लाइन वर्कर म्हणून रस्त्यावर उतरले. कधी प्रतिबंधात्मक परिसराला बंदोबस्त तर कधी रस्त्यावरील नाकाबंदी. कधी वाहनांवर कारवाई करताना थेट नागरिकांच्या संपर्कात पोलीस येत होते. त्यातून पोलिसांना करोनाची बाधा होऊ लागली.

आत्तापर्यंत 729 पोलसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. तर सध्या 88 पोलीस कर्मचारी बाधित आहेत. त्यापैकी 71 जण गृहविलगीकरणात असून 17 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोन पोलीस कर्मचारी ऑक्‍सिजनवर आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयात तीन हजार 140 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्यापैकी दोन हजार 574 पोलिसांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर एक हजार 152 जणांनी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मात्र करोना लसीचा दुसरा डोस घेऊनही 15 पोलीस कर्मचारी करोना बाधित झाले आहेत.

उर्वरित 566 कर्मचाऱ्यांपैकी काही महिला कर्मचारी गरोदर असून काही स्तनदा माता आहेत. तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर आजार असून डॉक्‍टरांच्या सल्ल्यामुळे त्यांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पोलिसांना फेसमास्क, सॅनिटायझर तसेच प्रतिकार शक्‍ती वाढविणाऱ्या “विटामीन-सी’ च्या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे.

पोलिसांकरिता रेमडेसिवीर इंजेक्‍शन राखीव
संपूर्ण राज्यात रेमडिसिव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 40 रेमडिसिव्हरचा इंजेक्‍शनचा साठा केला आहे. पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी किंवा पती, मुले आणि आई-वडिल यांना गरज लागल्यास रेमडिसिव्हरच दिले जाते. आता मिळालेल्या साठ्यापैकी 17 इंजेक्‍शन वापरण्यात आली आली आहेत. तसेच बाधित आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात सहायक पोलीस आयुक्‍त नंदकुमार पिंजण हे आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना इंजेक्‍शन, प्लाझमा किंवा इतर कोणतीही आवश्‍यकता असल्यास तात्काळ ते मदत करतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.