पुणे – मेट्रोचे सुरू असणारे काम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांदणी चौकातून शहरामध्ये येणाऱ्या खासगी, एसटी बसेससह अवजड वाहनांच्या वाहतुकीत शहर वाहतूक पोलिसांनी बदल केला आहे. दि. 1 ते 15 सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना कर्वेरस्ता आणि पौड रस्त्याचा वापर करता येणार नाही, अशी माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.
एसटीच्या मुळशी, मुंबई, ठाणे, बोरिवलीला जाणाऱ्या बस, शिवनेरी आणि शिवशाही बस कर्वे, पौड रस्त्याने चांदणी चौकमार्गे जातात. या मार्गे जाणाऱ्या खासगी लक्झरी बस, कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बसेस, ट्रक देखील मोठ्या संख्येने जातात. सध्या कर्वे-पौड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात मर्यादा येतात. गणेशोत्सवात कोंडीची समस्या भेडसावू नये म्हणून अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे. हा बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला आहे.
असा आहे बदल…
चांदणी चौकातून कोथरूडकडे येणाऱ्या जडवाहनांना कात्रजच्या दिशेने नवले ब्रिज येथून नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) जावे लागेल. त्यानंतर थेट कात्रजला येथून सातारा रस्त्याने शहरात जावे. तर डेक्कन, शिवाजीनगरकडून चांदणी चौकात जाणाऱ्या जड वाहनांनी लाल बहादूर शास्त्री रस्त्याने नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता)- नवले ब्रिज येथून महामार्गावर जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.