मोशीत सर्वाधिक 3545 मिळकती; तर पिंपरी गावात फक्त 83 मिळकतींची नोंद
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये शहरात नव्याने एकून 14 हजार 928 मिळकती आढळल्या आहेत. या सर्व मिळकतींची नोंद महापालिका दप्तरी करण्यात आली आहे. यामध्ये मोशीमध्ये सर्वाधिक3 हजार 545 तर पिंपरीनगर कर संकलनाच्या कार्यक्षेत्रात केवळ 83 नवीन मिळकती आढळल्या आहेत.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील 50 टक्के मिळकतींचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पंधरा दिवसात याचा अहवाल सादर करण्यचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला होता. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकाळात शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे 80 हजारांपेक्षा अधिक मिळकती नव्याने आढळल्या होत्या. या सर्व मिळकतींची महापालिका दप्तरी नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व मिळकतींना मिळकत कर लागू केल्याने कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची भर महापालिका तिजोरीत पडली होती. त्यानंतर आलेल्या आयुक्तांनी अशा मिळकतींचे पुन:सर्वेक्षण करण्याचे फारसे गांभिर्याने घेतले नाही.
दरम्यान, महापालिकेच्या उत्पन्नात कशाप्रकारे वाढ करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली होती. या चर्चेदरम्यान करसंकलन विभागाकडे नोंद नसलेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करुन, त्याची करसंकलन विभागात नोंद केल्यास त्यामुळे उत्पन्नात भर पडू शकेल, अशी सूचना मांडली होती. त्यानंतर पार्श्वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी 11 जूनला सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत मिळकत सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आठ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील 50 टक्के मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 24 जून ते 8 जुलै या पंधरा दिवसांत रॅण्डमली (सरसकट) या मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये आकारणी न झालेल्या मिळकती, वाढीव बांधकाम झालेल्या मिळकती, वापरात बदल झालेल्या मिळकतींचा गटनिहाय अहवाल तयार करण्यात आला आहे.