जिल्ह्यात 147 कोटींची कामे सुरू

कराड – युती सरकारने मागील पाच वर्षांत सातारा जिल्ह्यासाठी अनेक विकासयोजना अंमलात आणल्या आहेत. आघाडी सरकारच्या रखडलेल्या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्या पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यासाठी 147 कोटी रुपये एवढा भरघोस निधी सरकारने दिला असून, रखडलेल्या योजनांची काम सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक वर्षांचे प्रलंबित पाण्याचे प्रश्न मार्गी लागले असल्याची माहिती ना. शेखर चरेगावकर यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, घन:श्‍याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर यांसह कराड उत्तरमधील शेतकरी उपस्थित होते.

ना. चरेगावकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरण, तारळी धरण, टेंभू धरण, जिहे कटापूर योजना या प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यान्वित केलेली योजना आघाडी सरकारच्या काळात रखडल्या होत्या. या सर्व प्रकल्पांना आता गती आली असून लवकरच त्या पूर्णत्वास जातील.
जिल्ह्यातील प्रकल्पांना गतिमान करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. जनतेची दिशाभूल होऊन प्रत्यक्ष काम कोणी केले नाही. हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता या पद्धतीची प्रचारयंत्रणा आज राबवत आहे. जवळजवळ या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे, शेतजमिनीचे प्रश्न प्रलंबित होते. यासाठी आवश्‍यक केंद्र सरकारचा निधी राज्य सरकारने सर्व प्रकल्पासाठी आणला आहे. हे सर्व प्रकल्प युती सरकारने कार्यान्वित केलेले आहे.

आचारसंहितेपूर्वी हणबरवाडी-धनगरवाडी योजनेंतर्गत क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यादृष्टीने काम सुरू झाले आहे. हे पाणी लाभ क्षेत्रामध्ये पोहोचवणाऱ्या शामगाव, नागझरी, राजाचे कुर्ले या गावातून पाणी जाते, मात्र या गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी मिळत नाही. तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींना अनेक वर्षे कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी निवडून दिले. पण जनतेची प्रतारणा केली, अशी टीका ना. शेखर चरेगावकर यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर नाव न घेता केली.

टेंभू उपसा जलसिंचन योजनेतून माण खटाव तालुक्‍यातील 32 गावांना व जिहे कठापूर योजनेतून उत्तर माण तालुक्‍यातील 35 गावांना पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. उरमोडी कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईन कामाचे टेंडर काढले आहे. मेरवेवाडी तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडून लगतच्या सोळा गावांचा पाणी प्रश्न सोडवला. हणबरवाडी – धनगरवाडी योजनेस 26 कोटी एक लाख रुपये निधी देऊन मार्गी लावल्याने 35 गावांना याचा लाभ होणार आहे. यासह अन्य कामाबाबत चरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)