बोरीच्या १४२ शेतकऱ्यांनी एकरकमी भरले ५१ लाखांचे वीजबिल

गावची वाटचाल थकबाकीमुक्तीकडे, महावितरणने केला जाहीर सत्कार

बारामती(प्रतिनिधी) – एकीकडे शासनाच्या ‘कृषी वीज धोरणाचे’ लोकार्पण मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते होत असताना इंदापूर तालुक्यातील बोरी ह्या गावातील १४२ शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या ९६ लाख ७८ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी ( electricity bill )एकाच दिवशी ५१ लाख रुपयांचे वीजबिल एकरकमी भरुन शासनाने आणलेल्या कृषी धोरणाचे जंगी स्वागत केले आहे. या १४२ शेतकऱ्यांना तब्बल ४५ लाख ७६ हजार रुपयांची माफी मिळाली असून महावितरणने त्यांचा जाहीर सत्कार सुध्दा केला आहे.

बोरी (ता. इंदापूर) गावात महावितरणचे ( MSEDCL ) १०४१ कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे ७ कोटी ७१ लाखांची थकबाकी आहे. ह्या थकबाकीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरी येथे शेतकरी ग्राहकांचा मेळावा आयोजित केला होता. दोनशेहून अधिक शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.

मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व शेतकऱ्यांना ‘कृषी धोरण-२०२०’ ची सविस्तर माहिती दिली. पहिल्या चालू वर्षात सहभाग घेतल्यास दंड, व्याज, निर्लेखित करुन शिल्लक राहणाऱ्या सुधारित थकबाकी पैकी केवळ ५० टक्के रक्कम भरुन उर्वरित रक्कम माफ होणार हे समजताच शेतकऱ्यांनी लगोलग थकबाकी भरण्याची तयारी दर्शविली आणि तब्बल १४२ शेतकऱ्यांनी ५१ लाख २ हजार रुपये रक्कम भरली सुध्दा. या सर्व शेतकऱ्यांचा महावितरण तर्फे सत्कार करुन अन्य शेतकऱ्यांनीही अशीच थकबाकी भरण्याचे आवाहन पावडे यांनी केले. तर लवकरच बोरीला शंभर टक्के थकबाकीमुक्त करुन गावची वीज यंत्रणा सक्षम करण्याचा संकल्प सरपंच संदीप नेवरे, छत्रपती कारखान्याचे व्हा. चेअरमन बाळासाहेब पाटील यांचेसह ग्रामस्थांनी केला.

मेळाव्यास महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांची उपस्थिती होती. तर वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ, लासुर्णेचे शाखा अभियंता अजयसिंग यादव यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.