1,400 गावठाणांची मोजणी होणार दोन महिन्यांत

जमिनीच्या वादांसह अनेक प्रश्‍न सुटणार

पुणे – जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 400 गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून या कामास सुरुवात होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच गावठाणांची मोजणी केली जात आहे. भूमिअभिलेख विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गावठाणातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार असून त्यातून गावातील अतिक्रमणे, जमिनीच्या वादांसह अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनचा वापर करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या सहाय्याने फक्‍त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता.

शासनाने पाच ड्रोन उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतर आणखी 20 ड्रोन उपलब्ध होणार आहेत. पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कमी पाऊस असलेल्या हवेली, शिरूर, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्‍यांतील गावठाणांची मोजणी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बारामती, जुन्नर, मावळ, खेड, इंदापूर आणि तिसऱ्या टप्प्यात भोर, वेल्हा, मुळशी आणि आंबेगाव अशा क्रमाने या तालुक्‍यातील गावठाणांची मोजणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सर्व अधिकारी उपस्थित राहणार
गावठाण मोजणी प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी भूमि अभिलेख विभाग जिल्ह्यातील सर्व भूमि अभिलेख उपअधी, सर्व्हेअर यांची मदत घेणार आहे. त्यामुळे एका तालुक्‍यातील गावठाणांची मोजणी करतेवेळी इतर तालुक्‍यातील सर्व अधिकारी, सर्व्हेअर उपस्थित राहणार आहे. यामुळे गावठाणांची मोजणी वेळेत होण्यास मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.