पुणे – गेल्या वर्षभरात डेंग्यूचे 140 रुग्ण आढळले असून, सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यानच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. करोनाबरोबरीने डेंग्यू, चिकनगुनिया या रोगाचा प्रादुर्भावही सुरू होता. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले होते.
ज्या काळात करोना रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत गेली होती, तेव्हाच डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली होती. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत अनुक्रमे 10, 53, 65 रुग्णांची नोंद महापालिकेने केले. याशिवाय, जानेवारीमध्ये तीन, फेब्रुवारी मध्ये चार, तर डिसेंबरमध्ये पाच रुग्णांची नोंद झाली. डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या 2,504 जणांची तपासणी केली. त्यातील 140 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा निष्कर्ष निघाला.
डेंग्यूबरोबरीनेच चिकनगुनियाचेदेखील रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, वर्षभरात 36 जणांना चिकनगुनियाची लागण झाल्याची नोंद महापालिकेत करण्यात आली. त्यातही जानेवारी 2020 मध्ये सर्वाधिक म्हणजे 18 रुग्ण सापडले होते, तर त्यानंतर थेट सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे पाच, पाच आणि आठ रुग्ण सापडले. त्यामुळे करोना थैमानापुढे डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण यंदा कमी झाल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.