7 मतदारसंघात 116 उमेदवार रिंगणात ; मतदानासाठी 44 हजार ईव्हीएम, 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र
मुुंबई: लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील 7 मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठी एकूण 14 हजार 919 मतदान केंद्रे सज्ज तयार करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांसाठी सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले असून त्यासाठी 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात एकूण 4 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या 7 मतदारसंघात एकूण 116 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. सात मतदार संघात 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत. त्यामध्ये 66 लाख 71 हजार पुरुष, तर 63 लाख 64 हजार महिला आणि 181 तृतीयपंथी मतदार आहेत.
वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे. ज्या मतदार संघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.
वर्धा मतदारसंघ
– 2 हजार 26 एवढे मतदान केंद्र,
– 8 लाख 93 हजार पुरुष तर 8 लाख 48 हजार महिला मतदार – एकूण 17 लाख 41 हजार मतदार आहेत.
रामटेक मतदारसंघ
– 2 हजार 364 मतदान केंद्र
– 9 लाख 96 हजार पुरुष तर 9 लाख 24 हजार महिला मतदार – एकूण 19 लाख 21 हजार मतदार आहेत.
नागपूर मतदार संघ
– 2 हजार 65 मतदान केंद्र
– 10 लाख 96 हजार पुरुष तर 10 लाख 63 हजार महिला मतदार – एकूण 21 लाख 60 हजार एकूण मतदार आहेत.
भंडार-गोंदिया मतदारसंघ
– 2 हजार 184 मतदान केंद्र
– 9 लाख 5 हजार पुरुष तर 9 लाख 3 हजार महिला मतदार – एकूण 18 लाख 8 हजार मतदार आहेत.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघ
– 1 हजार 881 मतदान केंद्र
– 7 लाख 99 हजार पुरुष आणि 7 लाख 80 हजार महिला मतदार – एकूण 15 लाख 80 हजार मतदार आहेत.
चंद्रपूर मतदारसंघ
– 2 हजार 193 मतदान केंद्र
– 9 लाख 86 हजार पुरुष आणि 9 लाख 22 हजार महिला मतदार – एकूण 19 लाख 8 हजार मतदार आहेत.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघ
– 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत.
– 9 लाख 93 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 21 हजार महिला मतदार – एकूण 19 लाख 14 हजार मतदार आहेत.