जामखेड – टुरिस्ट व्हिजा असताना देखील जामखेड येथील धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होऊन 14 जणांनी धार्मिक प्रचार केला. तसेच व्हिजामध्ये दिलेल्या अटींचे व जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 परदेशी व चार परप्रांतीय, अशा चौदा नागरिकांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकन कोडिओ गॅस्टोन, कोने पेफीगोऊ हमीद, किटा मनाडो, कोमे ऍटोमो कपले मॅथीस, डोमबिया मोरी (सर्व रा. आयव्हरी कोस्ट), राशीद सईदी, माया सुलेमानी ऍथोमनी, अब्दल्ला सुलीशा सईदी (सर्व रा. टांझानिया), हैदरनीया अब्दुल नासीर (रा. इराण), पांचाभाई अब्दुल रहीम (रा. गुजरात), मोहमद अली अमिन (रा. मुंबई), मोहमद शाकीर, शेख अल अमीन (दोघे रा. तमिळनाडू) अशा 14 जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 14 मार्च रोजी 10 परदेशी व चार परराज्यातील नागरिक, असे एकूण 14 जण नगर जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. ते जामखेड येथील काझी गल्लीतील एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणी होते. प्रशासनाच्या ही गोष्ट 25 मार्च रोजी लक्षात आल्यावर जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल दत्तू अर्जुन बेलेकर यांनी याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात व्हिजामधील अटींचे, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून समाजातील इतरांचे आरोग्य धोक्यात आणले, असे म्हटले आहे.