सातारा : 14 तंत्रज्ञांची नव्याने नेमणूक

सातारा – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कुमक नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी दाखल झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग संचालनालयाच्यावतीने 32 वैद्यकीय अधिकारी व 14 तंत्रज्ञांची नियुक्ती जिल्हा आरोग्य यंत्रणेत करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. अपुऱ्या सुविधा आणि कुशल वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वेळेत व दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. करोनाबाधितांवरील उपचारांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयाच्याकडून सादर करण्यात आला होता.
सातारचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजोग कदम यांची आरोग्य उपसंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर, त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली काढला. आरोग्य संचालनालयाने 32 वैद्यकीय अधिकारी व 14 तंत्रज्ञांची जिल्ह्यात नियुक्ती केली आहे. यामध्ये दहा वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालयात, बारा वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयांमध्ये, तर उर्वरित दहा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग केंद्रांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकीमुळे जिल्हा रुग्णालयातील सर्व पदे भरली गेली आहेत. याशिवाय 14 तंत्रज्ञांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एक वर्षाच्या सेवेचे करार करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात याच पद्धतीने परिचारिकांची पदे कायमस्वरूपी भरण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.





