नवी दिल्ली – अनौपचारक क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरू केले आहे. चार महिन्यांमध्ये देशातील 14 कोटी कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे.
त्यामुळे एकूण कामगारांच्या 30 टक्के कामगारांची नोंदणी या पोर्टलवर झाली असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना अनेक अडचणी असतात. मात्र त्यांची नोंदणी नसल्यामुळे सरकारला त्यांना मदत करता येत नव्हती.
आता या कामगारांची नोंदणी झाल्यामुळे अडचणीच्या काळामध्ये केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला कामगारांना सहज मदत करता येईल. पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जास्त कामगारांची नोंदणी झाली. एकूण नोंदणी झालेल्या कामगारांमध्ये 53 टक्के महिला आहेत तर 47 टक्के पुरुष आहेत.
यातील 94 टक्के कामगारांचे उत्पन्न 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. तर चार टक्के कामगारांचे उत्पन्न 10 हजार रुपयांपक्षा जास्त आणि 15 हजार रुपयापेक्षा कमी आहे. एकूण नोंदणी झालेल्या कामगारांमध्ये 51 टक्के कामगार कृषी क्षेत्रात, 11 टक्के कामगार बांधकाम क्षेत्रात, दहा टक्के कामगार घरकाम क्षेत्रात, साडेसहा टक्के कामगार कापड उद्योगात आहेत.
61 टक्के कामगाराचा वयोगटात 18 ते 40 वर्ष, 20 टक्के कामगारांचा वयोगट 40 वर्षे ते 50 वर्ष, चार टक्के कामगार वयोगट 16 ते 18 वर्षाचा आहे.