सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज एकूण 14 जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील 122 नागरिकांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. पुणे येथील एनसीसीएसकडून काल (दि. 6) रात्री उशिरा आलेल्या 196 रिपोर्टस्पैकी फलटण तालुक्यातील वडले येथील 52 वर्षांच्या पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर उर्वरित 195 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
करोनामधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातून एकाला, पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटलमधून तिघांना, खावली, ता. सातारा येथील करोना केअर सेंटरमधून एकाला, रायगावच्या कोव्हिड हेल्थ सेंटरमधील दोघांना, वाईतून चौघांना आणि मायणी मेडिकल कॉलेजमधून तिघांना कोरोनमुक्तीमुळे दहा दिवसानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. या सर्वांना टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देण्यात आल्या.
122 नमुने तपासणीसाठी पुण्याला
जिल्हा रुग्णालयातील 33, शिरवळ करोना केअर सेंटर येथील 39, पानमळेवाडी येथील करोना केअर सेंटरमधील 13, मायणी येथील 21 व महाबळेश्वर येथील 16, अशा एकूण 122 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.