नवी दिल्ली – नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती काही प्रमाणात जास्त असूनही नागरिकांकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. 2024 मध्ये तब्बल 14.08 लाख इतकी इलेक्ट्रिक वाहने विकली गेल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमार स्वामी यांनी दिली.
2024 मध्ये एकूण वाहनांच्या संख्येत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण वाढून 5.59 टक्क्यांवर गेले आहे. गेल्या वर्षी या महिन्यात एकूण वाहन संख्येत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण 4.44 % होते. इलेक्ट्रिक वाहन निर्माण करणार्या कंपन्या जबाबदारीने चगली वाहने उपलब्ध करत आहेत. नागरिकांमध्ये या वाहनांबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या वाहनांची विक्री वाढावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत.
यामुळे भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 2023 मध्ये इलेक्ट्रिकल वाहन विक्री 10.22 लाख इतकी होती. जागतिक वाहन बाजारात आणि अर्थव्यवस्थेत अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र भारतातील वाहन क्षेत्रात आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात प्रगती चालू आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
ते म्हणाले की, 2024 मध्ये वितरकांनी ग्राहकांना विकलेल्या सर्व वाहनाची संख्या 9 टक्क्यांनी वाढून 26.1 दशलक्ष इतकी झाली आहे. त्यामुळे वाहन क्षेत्रात उमेदीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने वाहन निर्मिती आणि वहनाच्या सुट्या भागाच्या निर्मितीसाठी 25,938 कोटी रुपयांची उत्पादन आधारित अनुदान योजना जाहीर केली आहे. त्यासाठी 115 अर्ज आले होते. त्यापैकी 82 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या माध्यमातून 42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.