13,336 नागरिकांना फटका

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : सर्व सुविधा पुरविण्याचे प्रयत्न

पुणे – मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या भागांत पाणी शिरल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील एकूण 13 हजार 336 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यामध्ये घाबरून जाण्याची परिस्थिती नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. जिल्ह्यातील 18 धरणे 100 टक्के भरली आहे. तर उर्वरित धरणांमध्ये 90 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.

वार्षिक सरासरीच्या 108 टक्के पाऊस
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 108 टक्के पाऊस झाला आहे. यात मावळ-200, मुळशी-134, भोर-141, जुन्नर-127, खेडमध्ये 139 टक्के पाऊस झाला आहे. तर, इंदापूर-31, दौंड-40, बारामती-58 आणि शिरूरमध्ये 69 टक्के पाऊस झाला आहे.

नुकसानीची भरपाई तातडीने
शहर तसेच ग्रामीण भागात ज्या ठिकाणी नदीचे पाणी शिरले आहे. त्याठिकाणी अजूनही पाणी साचलेले आहे. याठिकाणचे पाणी कमी होताच प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंचनामे झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नागरिकांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.