नगर, (प्रतिनिधी) – महावितरणने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. नगर मंडळातील १ लाख ९९ हजार १४२ वीज ग्राहकांकडून मूळ थकबाकी १३३ कोटी १६ लाख रुपये ग्तसेच १९ कोटी ५३ लाख रुपये व्याज व विलंब आकार आहे.
अभय योजना २०२४ नुसार थकबाकी एकरकमी भरल्यास थकबाकी वरील व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ दि. ३० नोव्हेंबर पर्यंत घेता येणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे.
थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. नाशिक परिमंडळ अंतर्गत नाशिक मंडळातील ९२ हजार ४७७ वीजग्राहकांकडून मूळ थकबाकी ९६ कोटी २७ लाख रुपये तसेच १३ कोटी २१ लाख रुपये व्याज व विलंब आकार आहे.
तसेच मालेगांव मंडळातील ६२ हजार १६८ वीजग्राहकांकडून मूळ थकबाकी ४२ कोटी ९ लाख रुपये तसेच ५ कोटी २५ लाख रुपये व्याज व विलंब आकार आणि अहमदनगर मंडळातील १ लाख ९९ हजार १४२ वीजग्राहकांकडून मूळ थकबाकी १३३ कोटी १६ लाख रुपये तसेच १९ कोटी ५३ लाख रुपये व्याज व विलंब आकार आहे.
नाशिक परिमंडळात ३ लाख ५३ हजार ७८७ वीजग्राहकांकडून मूळ थकबाकीची २७१ कोटी ५२ लाख रुपये तसेच ३७ कोटी ३९ लाख रुपये व्याज व विलंब आकार येणे आहे.
त्यामुळे महावितरण विभागाने वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येणार आहे.
योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.
तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी अभय योजना आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.