खेडमध्ये खरिपासाठी 132 कोटींचे कर्ज वाटप

राजगुरूनगर – पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 18 शाखांमधून खेड तालुक्‍यातील 100 पेक्षा अधिक सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून यावर्षी खरीप हंगामातील 22 हजार 308 शेतकऱ्यांना 132 कोटी 47 लाख 87 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती बॅंकेचे संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व बॅंकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर यांनी दिली.

आतापर्यंत तालुक्‍यातील सभासदांना 17 हजार 917 हेक्‍टर क्षेत्रासाठी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यावर्षी टोमॅटो, बटाटा, भात, कांदा या पिकांसाठी कर्जवाटप करण्यात आले आहे. टोमॅटो पिकासाठी राजगुरूनगर, चाकण, भोसे, बहुळ. बटाटा पिकासाठी वाडा, वाफगाव, कडूस, दावडी, चास पाईट, कुरकुंडी, शिवे, पाबळरोड तळेगावचौक (चाकण), तर भात पिकासाठी वाडा, आंबोली, डेहणे या शाखांतून पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी 24 हजार 738 सभासदांना 141 कोटी 66 लाख 73 हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यावर्षी पीक कर्जाची रक्‍कम मोठी आहे. आतापर्यंत सुमारे 50 ते 55 टक्‍के पीक कर्ज वाटप झाले आहे. यावेळी बॅंकेच्या तीन शाखा वाढल्या आहेत. मागील वर्षी नोट बंदी आणि कर्जमाफी असल्याने वाटप कमी झाले होते. यावर्षी मात्र अडीचशे कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप होण्याची शक्‍यता आहे. यावर्षी भात पिकासाठी बॅंकेच्या माध्यमातून हेक्‍टरी 50 हजार, टोमॅटो पिकासाठी हेक्‍टरी 80 हजार, कांद्यासाठी हेक्‍टरी 70 हजार, तर बटाटा पिकासाठी हेक्‍टरी 80 हजार रुपये पीक कर्ज दिले जात आहे.

मागील वर्षी घेतलेले कर्ज अनेक शेतकऱ्यांनी परत भरले नसल्याने आतापर्यंत केवळ 50 टक्‍के कर्ज वाटप झाले आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी थकीत पिक कर्ज भरावे. राज्यशासनाच्या व्याज सवलतीचा फायदा घ्यावा.
– विलास भास्कर, विभागीय अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बॅंक

Leave A Reply

Your email address will not be published.