चाकण अमली पदार्थ प्रकरण : उत्पादन खर्च 60 हजार, किंमत दोन कोटी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 7 ऑक्टोबर रोजी चाकण येथून 20 कोटी रुपयांचे 20 किलो “मेफेड्रोन’ (एमडी) जप्त केले होते. या प्रकरणातून धक्कादायक माहिती पुढे येत असून, आरोपींनी रांजणगाव येथील बंद औषध कंपनीत तब्बल 132 कोटींचे अमली पदार्थ बनविले आहेत. त्यापैकी 112 कोटींचे “मेफेड्रोन’ची विक्री करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये नायजेरियन आरोपीसह छोटा राजन टोळीचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. हे अमली पदार्थ बनविण्यास प्रतिकिलो 60 हजार रुपये खर्च येत होता आणि याची किंमत बाजारात प्रति किलो दोन कोटींपर्यंत आहे.
तुषार सूर्यकांत काळे (रा. बोरीवली), राकेश श्रीकांत खानिवडेकर ऊर्फ रॉकी (रा. वसई), किरण राजगुरू, अशोक संकपाळ, किरण काळे यांच्यासह झुबी इफनेयी उडोको या नायजेरियन आरोपीसही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 85 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली.
तर यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे पकडलेल्या “मेफेड्रोन’ तपासात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. आरोपींना हे अमली पदार्थ तयार करण्यासाठी प्रतिकिलोला 60 हजार रुपयांचा खर्च आला आहे.
तर दोन कोटी रुपये प्रतिकिलो दराने त्याची विक्री करीत होते. आतापर्यंत आरोपींनी 112 कोटींचे मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात पुढे आले आहे. रांजणगाव येथील संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत “मेफेड्रोन’ बनविल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सदरची कंपनी सील केली आहे.
आरोपी तुषार सूर्यकांत काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याचे छोटा राजन टोळीशी थेट संबंध आहेत. त्याच्यावर खून, खंडणी, जबरी चोरी, हत्यार बाळगणे असे एकूण आठ गुन्हे दाखल असून, तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.