आचारसंहिता भंगाच्या 131 तक्रारी; 75 नोटिसा

लगबग खर्चाच्या हिशोबाची

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून केल्या जात असलेल्या खर्चावर निवडणूक विभागाने सूक्ष्म नजर ठेवली आहे. उमेदवारांनी सादर केलेला निवडणूक खर्च बरोबरच आहे का? याची जुळवणी स्वत: निवडणूक विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ताळेबंद पत्रकाद्वारे करण्यात येत आहे. आज सोमवार दि. 15 एप्रिल रोजी मावळ लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी आपल्या पहिल्या टप्प्यातील खर्च उमेदवारांनी सादर केला. मावळ लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्ष व पात्र उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान आत्तापर्यंत केलेला खर्च निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. निवडणूक विभागाने उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्च विषयक लेखे, रोखे नोंदवही व बॅंक नोंदवही यांची तपासणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील हा खर्च सादर झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील खर्च 20 एप्रिल रोजी तर तिसऱ्या टप्प्यातील खर्च 27 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत सादर करावा लागणार आहे.

पिंपरी – “मावळ’ लोकसभेच्या आखाड्यात यावेळी अत्यंत चुरशीची लढाई होत आहे. सर्वच उमेदवारांनी जोर लावून प्रचार सुरू केला असल्याने निवडणूक विभागाला बारकाईने लक्ष द्यावे लागत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आचारसंहिता भंग केल्याच्या तब्बल 131 तक्रारी अवघ्या काही दिवसातच निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. आलेल्या तक्रारींची गांभिर्याने दखल घेत निवडणूक आयोगाने उमेदवार, त्यांचे समर्थक, प्रचार करणारे यांना 75 नोटीस पाठवल्या असून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यास निवडणूक विभागाने सुरुवात केली आहे. 131 तक्रारींपैकी 56 तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्याने या निकाली काढण्यात आल्या आहेत. तर 75 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने निवडणूक आयोगाने संबंधितांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. योग्य उत्तर न देता आल्यास आयोगाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

“मावळ’ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडली जावी, यासाठी निवडणूक विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. वेगवेगळ्या घडामोडीमुळे “मावळ’ लोकसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेला आला आहे. विविध राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवार देखील आपली ताकद पणाला लावून प्रचार करीत आहेत. या सर्व घडमोडींवर निवडणूक विभाग करडी नजर ठेवून आहे. अशातच प्रचारकाळामध्ये आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीची शहानिशाही निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

निवडणूक विभागाला आत्तापर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष अशा 131 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर्षी पहिल्यांदाच आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा नागरीक पूरेपूर वापर करीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रचारासाठी आणखी तेरा दिवस शिल्लक असल्यामुळे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

सर्वाधिक तक्रारी चिंचवडमधून

मावळ लोकसभेसाठी आत्तापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक 70 तक्रारी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून प्राप्त झाल्या आहेत. त्यापाठोपाठ मावळ विधानसभा मतदारसंघातून 37 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच पनवेल 3, कर्जत 1, उरण 15, पिंपरीत 5 अशा एकूण 131 तक्रारी दाखल केल्या आहेत. निवडणूक विभागाकडून प्राप्त तक्रारींपैकी शहानिशा केल्यानंतर 56 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तर, 75 तक्रारींमध्ये तथ्य आढळले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.