1300 पुस्तकांचे इतिहास तज्ज्ञांकडून परीक्षण; अहवाल शासनाकडे पाठविणार

पुणे – राज्य शासनाच्या एकभाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेतील संत व महापुरुषांवरील 1 हजार 300 पुस्तकांचे इतिहास तज्ज्ञ समितीकडून परीक्षण पूर्ण झाले आहे. जून अखेर उर्वरित 200 पुस्तकांचे परीक्षण पूर्ण होणार असून तज्ज्ञ समितीचे सर्व पुस्तकांबाबतचे परीक्षण अहवाल शासनाकडे अंतिम कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने एकभाषिक पुस्तकांच्या योजनेतील पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी वितरीत करण्यात येतात. यात विविध प्रकारच्या व विषयांच्या पुस्तकांचा समावेश असतो. संत व महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठीही त्यासंबंधातील पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असतात.

विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी शासनाच्या आदेशानुसार दोन पुस्तकांबाबत संघटनांनी नोंदविलेल्या आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी तीन इतिहास तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीत डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष), डॉ.गणेश राऊत (सदस्य), पांडुरंग बलकवडे (सदस्य) यांचा समावेश करण्यात आला होता. या तज्ज्ञ समितीने कसून पुस्तकांचे परीक्षण करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार दोन्ही आक्षेपार्ह मजकुरांची पुस्तके रद्द करण्याचा निर्णय गेल्या ऑक्‍टोबरमध्येच शासनाने घेतला होता.

भविष्यात एकभाषिक पुस्तक योजनेतील संत, महापुरुषांवरील पुस्तकांमधील मजकुराबाबतीत कोणी आक्षेप घेऊन नये व काही वाद निर्माण होऊ नयेत याची खबरदारी म्हणून सर्व पुस्तकांचे परीक्षण याच इतिहास तज्ज्ञांच्या समितीकडून सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णयही त्याच वेळी जाहीर करण्यात आला होता. यानुसार समितीतील तज्ज्ञ त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार विद्या प्राधिकरणाच्या कार्यालयात येऊन पुस्तक परीक्षणाचे काम करत आहेत. ऑक्‍टोबरपासून हे काम अद्यापही सुरुच आहे. प्रत्येक पुस्तकाचा स्वतंत्र अहवाल ते तत्काळ सादर करत असतात. एकुण सुमारे 1 हजार 500 पुस्तकांचे परीक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. यातील बहुसंख्य पुस्तक परीक्षणांचे काम पूर्ण झाले आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.