मुंबई – करोना विरोधात लढा देणाऱ्या आणखी 130 पोलिस कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासांत करोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 2095 पोलीस करोनाबाधित आहेत. यात 236 पोलीस अधिकारी आणि 1859 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 22 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 897 पोलिसांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.
राज्यात सतत वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यात मुंबईत आज आणखी 22 पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचे काम करणाऱ्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ लागला आहे. करोनाविरुद्ध युद्ध लढणाऱ्या करोना वीरांना या धोकादायक विषाणूंची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या 1529 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. आतापर्यत करोनामुळे 25 कर्मचाऱ्यांनी प्राण गमावला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा बीएमसीने ही आकडेवारी जाहीर केली आहे.