पुणे – शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, मागील दोन वर्षांत नियमभंग करणाऱ्यांकडे 130 कोटींचा दंड थकला आहे. त्याच्या वसुलीसाठी वाहतूक विभागाने अनेकदा विशेष मोहिम राबवली. मात्र, त्याला पुणेकरांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये नियमाचा भंग करणाऱ्या 20 लाख 92 हजार वाहनचालकांवर 80 कोटी 47 लाखांचा दंड लावला होता. यापैकी 18 कोटी 66 लाखांचा दंड वाहनचालकांनी भरला आहे. यातील 9 कोटींचा दंड तर विशेष मोहिम राबवून वसूल केला. 2020 मधील 61 कोटी 81 लाखांचा दंड अद्यापही वसूल होणे बाकी आहे. तर, 2019 मध्ये वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या 25 लाख 3 हजार वाहनचालकांवर 109 कोटींचा दंड लादला होता. त्यातील आजवर फक्त 40 कोटी 51 लाखांचा दंड वसूल झाला आहे.
उर्वरीत 68 कोटी 49 लाखांचा दंड येणे बाकी आहे. दंडाची नोटीस मोबाइलवर प्राप्त झालेल्यापैकी फक्त 23 टक्के वाहनचालकांनीच आजवर दंड भरला आहे. दोन वर्षांची दंड वसुलीची आकडेवारी लक्षात घेता 2019 पेक्षा 2020 दंडाची रक्कम कमी मिळाल्याचे दिसते. यामागे लॉकडाऊन हे कारण असल्याचे दिसते. लॉकडाऊनमध्ये काही महिने वाहनांना रस्त्यावर परवानगी नव्हती. यामुळे कोणतीही विशेष मोहिम राबवून वसुली करता आली नाही. सध्याही रस्त्यांवर फक्त 70 टक्केच वाहनांची रहदारी दिसत आहे. आता पुन्हा वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबवून थकीत दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
दंड थकवणाऱ्या वाहनचालकांना नोटीस
वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले, सध्या आमचे प्राधान्य गर्दीवेळी वाहतूक नियंत्रण आणि वाहनचालकांना शिस्त लावण्याचे आहे. मात्र, दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत आम्ही विशेष मोहिम राबवत थकीत दंडाची वसुली सुरू केली आहे. वाहतूक शाखेचे कर्मचारी सिग्नलला थांबून गाड्यांचा नंबरवरून त्याचा दंड किती थकला आहे हे तपासत आहेत. यानंतर वाहनचालकांना दंड भरण्याची विनंती केली जाते. या व्यतिरीक्त दंड थकवणाऱ्या वाहनचालकांना नोटीसही पाठवण्यात येते. परंतु, त्याला काही मर्यादा येत असल्याने हे प्रमाण कमी आहे.
वर्ष एकूण चलन दंडाची रक्कम भरलेला दंड
2020 20.92 लाख 80.84 कोटी 18.66 कोटी
2019 25.35 लाख 109 कोटी 40.51 कोटी