आष्टी – बीड जिल्ह्यात आयपीएस होण्याची इच्छा ठेवणाऱ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्यात एका अवघ्या 13 वर्षांच्या मुलीने स्पर्धापरिक्षेत यशस्वी होण्याच्या भविष्यातील इच्छेची वाच्यता करून मृत्यूला कवटाळले आहे.
गळफास घेतल्यानंतर या मुलीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट सापडली. या सुसाइड नोटमध्ये, मला आयपीएस व्हायचे होते. मात्र, आता सगळे संपलंय, असे लिहित संबंधित मुलीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधित तपास करीत आहेत.
मृत मुलीचे आई-वडील उसतोड कामगार असल्याने मामा आणि आजोबा तिचा संभाळ करीत होते. दरम्यान, मंगळवारी घरातील सर्वजण शेतात गेले असताना ती घरी एकटीच होती. त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मामा आणि आजोबा घरी परतले असता मुलीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपासादरम्यान पोलिसांना मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली.
चिठ्ठीत नेमकं काय लिहलं?
मला आयपीएस व्हायचे होते. मात्र, आता सगळे संपलंय, ताईला घेऊन जा तुमच्यासोबत कारखेलला, मी चालले आहे., असे या मुलीने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. आता सगळे संपलंय, याचा नेमका अर्थ काय? आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने असे का लिहिले? असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. आयपीएस होण्याची इच्छा ठेवणाऱ्या 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.