पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 446 मतदान केंद्र असून त्यातील 13 संवेदनशील, तर 1 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे. यावेळी वारजे येथील मतदान केंद्र क्रमांक 86 हे सखी मतदान केंद्र असणार आहे. मतदानासाठी महिलांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी हे केंद्र असून येथील कर्मचारीही महिलाच असतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.
मतदारसंघातील एकूण मतदारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार असून त्याप्रमाणे केंद्र निश्चिती करून वोटर स्लीप वाटण्यात येणार आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी 13 संवेदेनशील मतदान केंद्र असून खेड शिवापूर येथील मतदान केंद्र क्रमांक 431 हे अतिसंवेदनशील आहे. त्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव या मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, वायरलेस फोन यंत्रणा, पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस (सीआरपीएफ) दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी 2 हजार 230 एवढे मनुष्यबळ लागणार असून यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असून इव्हीएम मशीन, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट या सर्वांसाठी 90 बसेस, 47 जीप आणि परिस्थितीनुसार अतिरिक्त वाहने असे नियोजन करण्यात आल्याचे बारवकर यांनी सांगितले.