पुणे : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. वनराज याची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात आपला तळ ठोकला होता. पोलिसांनी तातडीने आपली सूत्रे हलवत या हत्या प्रकरणातील आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक केली आहे. आज सायंकाळी ताम्हिणी घाटातून 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते, जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या आरोपींच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी अनेक पथके नेमून शोधासाठी रवाना केली होती.
काय घडले होते नेमके?
पुण्यातील नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन चौकात मित्रासोबत उभे असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. यावेळी, थेट वनराज यांच्या अंगावर धावून जात आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र, गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यातच वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घरगुती संपत्तीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे समजत आहे.