सातारा -जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे सातारा तालुक्यात शाहुपुरी ग्रामपंचायत हद्दीत 13 करोना रुग्णांचे गृह विलगीकरण करण्यात आले. हे रूग्ण आठ घरांमध्ये असून विलगीकरणाची पाटी तिथे झळकविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब पवार यांनी दिली.
दरम्यान, सोमवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरात 12 तर तालुक्यात 16 असे 28 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात एकूण 230 कंटेनमेंट झोनमध्ये आजअखेर 796 बाधित रुग्ण असून 130 ऍक्टिव्ह झोन आहेत. 100 झोनवरील बंदी उठवण्यात आली आहे.
सातारा शहरालगतच्या संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीत सत्वशीलनगर येथे पाच पुरुष, तीन महिला व एक अल्पवयीन मुलगा बाधित आढळून आला आहे. येथे 27 जुलै रोजी पहिला रुग्ण आढळला होता. आता दोन कुटुंबांतील नऊ जण येथे बाधित झाले आहेत. काळोशी येथे दोन पुरुष, एक महिला व सात वर्षाची अल्पवयीन मुलगी बाधित आढळली. आंबेदरे येथे एक पुरुष तर शाहुपुरी येथे दोन महिला करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. मतकर कॉलनीत आठ घरातील 13 रुग्णांना गृह विलगीकरण करण्यात आले.
हवेची उत्तम सोय, स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था व रुग्णांच्या तब्येतीचा समाधानकारक अहवाल प्राप्त झाल्याने 13 रुग्णांना घरातच विलग करण्यात आले आहे. आरोग्य सेविका व आशाताई वर्कर येथे तैनात करण्यात आल्या असून दूरध्वनीवरून होम आयसोलेशनची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाधित रुग्णांच्या हातावर शिक्के मारण्यात आले असून संबंधित घरांवर विलगीकरणाची पाटी लावण्यात आल्याचे डॉ. दादासो पवार यांनी स्पष्ट केले.सातारा शहरात जिल्हा रुग्णालय व सातारा पालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा सावळा गोंधळ अद्याप सुरूच आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या हवाल्याने सर्वोदय कॉलनी (रविवार पेठ) येथे दोन पुरुष, शाहूनगर येथे एक पुरुष, यशवंत कॉलनी येथे एक महिला, सदरबझार येथे एक पुरुष, रविवार पेठेत तीन पुरुष व एक महिला व लक्ष्मी टेकडी येथे एक पुरुष व एक महिला असे एकूण बारा रूग्ण बाधित आढळले अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पण नगरपालिका करोना कक्षाच्या माहितीनुसार शाहूनगर येथे दोन व शनिवार पेठेत एक वृद्धा बाधित असल्याचे कक्ष प्रमुख प्रणव पवार यांनी सांगितले. शाहूनगर येथील एसटी कॉलनीच्या पिछाडीला असणाऱ्या दोन इमारतीमध्ये दोन स्वतंत्र कंटेनमेंट झोन तयार करण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.