अमरावती – आंध्रप्रदेशात बुधवारी एका औषधनिर्मिती कारखान्याला भीषण आग लागली. त्या अग्नितांडवात १३ कर्मचारी मृत्युमुखी पडले. दुर्घटनेवेळी भाजलेल्या ३३ जणांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आंध्रच्या अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतपूरमस्थित कारखान्यात प्राथामिक माहितीनुसार रिॲक्टरचा स्फोट झाला. त्यानंतर कारखान्यातील काही भागांना आगीने घेरले. त्याविषयीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकांना १३ जणांना वाचवण्यात यश आले. संबंधित कारखान्यात ३८१ कर्मचारी २ शिफ्टमध्ये काम करतात. स्फोट दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. त्यावेळी जेवणाची सुटी असल्याने कारखान्यात कमी कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, आंध्रचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच, मृतांच्या कुटूंबीयांच्या पाठिशी उभे राहण्याची ग्वाही दिली.