पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि. 30) आणखी 13 करोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर, दोन ज्येष्ठ नागरिकांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
रुग्णालयात नव्याने आढळलेल्या करोनाबाधितांमध्ये पाषाण, चिंचवड, विशालनगर, रहाटणी, बोपोडी, पुणे, पिंपळे गुरव येथील रुग्णांचा समावेश आहे. करोनाबाधितांमध्ये अनुक्रमे 2, 10 आणि 14 वर्षाच्या 3 मुली आणि 3 वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे. त्याशिवाय 18 ते 26 वयोगटातील 4 तरुणींना देखील करोनाची लागण झाली आहे.
जुनी सांगवी येथील 92 वर्षीय वृद्ध आणि सासवड येथील 60 वर्षीय ज्येष्ठ महिलेवर उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 53 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
रुग्णालयामध्ये आज नव्याने 5 करोना संशयितांना उपचारासाठी दाखल करून घेतले. सध्या 49 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.