सातारा – लंपी स्किन आजारामुळे जिल्ह्यात सोमवारी एका दिवसात 13 जनावरांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 75 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 89 गावांमधील 1146 जनावरे बाधित असून 154 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत. जिल्ह्यात दोन लाख 47 हजार 553 जनावरांचे लसीकरण झाले असून त्याची टक्केवारी 70.33 टक्के असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
महाबळेश्वर वगळता संपूर्ण जिल्ह्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव आहे. रविवारी एका दिवसात 90 जनावरे बाधित आढळून आली. जिल्ह्यात बाधित क्षेत्रात 1 लाख 57 हजार 98 तर अन्य क्षेत्रात 11 हजार 246 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लंपी स्किनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका पशुचिकित्सालयात उपलब्ध आहेत.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी पशुवैद्यकीय सेवादात्यांमार्फत लंपी रोगाचे लसीकरण करण्यात येत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील जिंती, साखरवाडी, खटाव तालुक्यातील अनपटवाडी, निमसोड, धोंडेवाडी, कराड तालुक्यातील वाघेरी, पाटण तालुक्यातील तारळे या सात गावांमध्ये लंपी स्किन बाधित जनावरांची संख्या वाढली आहे. या सात हॉटस्पॉटवर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने विशेष लक्ष देण्यात येत आहे. बॉम्बे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मुंबईच्यावतीने फलटण तालुक्यात 43 हजार रुपयांच्या औषधांचे वाटप करण्यात आले आहे. प्रशासनाला खासगी पशुपदविकाधारकांसह विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात विविध प्रकारच्या 40 हजार भित्ती पत्रकांद्वारे गावागावी जनजागृती करण्यात येत असल्याचे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.